Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी आहे तोवरच विमा! कंपनीच्या मेडिक्लेमवर विसंबून राहणे धोक्याचे; नितीन कामथ सांगितले 'हे' कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 15:32 IST

Corporate Health Insurance : नितीन कामथ यांनी स्पष्ट केले की, कंपनीकडून दिला जाणारा आरोग्य विमा अनेकदा अपुरा असतो. त्यांनी वैयक्तिक आरोग्य विमा घेण्याचा सल्ला दिला, कारण कॉर्पोरेट योजनांमध्ये अनेक मर्यादा असतात आणि नोकरी बदलल्यास पॉलिसी रद्द होण्याचा धोकाही असतो.

Corporate Health Insurance : खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना कंपनीकडून 'ग्रुप हेल्थ इन्शुरन्स' किंवा 'कॉर्पोरेट मेडिक्लेम'ची सुविधा मिळते. अनेकजण या सुविधेलाच पुरेसे मानून स्वतःचा वेगळा विमा काढत नाहीत. मात्र, ही चूक भविष्यात महाग पडू शकते, असा इशारा देशातील आघाडीची ब्रोकिंग फर्म 'झिरोधा'चे सह-संस्थापक नितीन कामथ यांनी दिला आहे. कॉर्पोरेट विमा आणि वैयक्तिक विमा यातील फरक स्पष्ट करताना त्यांनी मध्यमवर्गीयांना आर्थिक सुरक्षेचा कानमंत्र दिला आहे.

कॉर्पोरेट विम्याच्या मर्यादानितीन कामथ यांच्या मते, कंपन्या जेव्हा कर्मचाऱ्यांसाठी विमा पॉलिसी निवडतात, तेव्हा त्या सुविधांपेक्षा 'खर्चावर' अधिक लक्ष देतात. यामुळे अनेक मर्यादा येतात. कॉर्पोरेट पॉलिसीमध्ये हॉस्पिटलच्या रूम रेंटवर मर्यादा असते. जर तुम्ही महागडी रूम निवडली, तर त्याचा परिणाम डॉक्टरांची फी आणि इतर खर्चांच्या परताव्यावर होतो, ज्यामुळे क्लेमची रक्कम अपेक्षेपेक्षा कमी मिळते. जोपर्यंत तुम्ही त्या कंपनीत आहात, तोपर्यंतच तुम्हाला विमा कवच मिळते. नोकरी सोडल्यास किंवा कंपनीने पॉलिसी बंद केल्यास तुम्ही विमाछत्राबाहेर फेकला जाता.

१४% 'वैद्यकीय महागाई'चा धोकाभारतात वैद्यकीय क्षेत्रातील महागाई वार्षिक १४ टक्क्यांनी वाढत असल्याचा अंदाज आहे. करिअरच्या सुरुवातीला ५-१० लाख रुपयांचे कवच पुरेसे वाटू शकते, पण वाढत्या वयानुसार आणि महागाईनुसार ही रक्कम अत्यंत तोकडी पडते. वैयक्तिक पॉलिसीमध्ये तुम्ही तुमचे कव्हर हवे तेव्हा अपग्रेड करू शकता, जे कॉर्पोरेट पॉलिसीमध्ये शक्य नसते. जर तुम्ही केवळ कंपनीच्या विम्यावर अवलंबून राहिलात आणि भविष्यात एखादा आजार उद्भवला, तर त्यानंतर नवीन वैयक्तिक पॉलिसी घेताना विमा कंपन्या त्या आजाराला 'आधीचा आजार' मानून कव्हर देण्यास नकार देऊ शकतात किंवा वेटिंग पिरीयड वाढवू शकतात.

वाचा - तेलाचा भडका आणि डॉलरची ताकद; यावेळी सोनं का साथ देईना? वाचा सविस्तर विश्लेषण

'नो-क्लेम बोनस'चा असा घ्या फायदाकामथ यांनी एक महत्त्वाची रणनीती सुचवली आहे,  तुमच्याकडे कॉर्पोरेट आणि वैयक्तिक अशा दोन्ही पॉलिसी असतील, तर लहान-मोठ्या उपचारांसाठी प्रथम कॉर्पोरेट पॉलिसीचाच वापर करा. यामुळे तुमच्या वैयक्तिक पॉलिसीचा 'नो-क्लेम बोनस' वाढत राहील आणि संकटाच्या वेळी तुमच्याकडे मोठे विमा कवच उपलब्ध असेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Relying on company health insurance is risky, warns Zerodha's Kamath.

Web Summary : Corporate health insurance has limitations; personal policies offer better coverage and flexibility. Medical inflation rises yearly. Use corporate policies for minor claims to preserve your personal policy's 'no-claim bonus' for significant health needs.
टॅग्स :वैद्यकीयऔषधंहेल्थ टिप्स